असे जपता येईल पर्यावरण
पर्यावरण पूरक अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण सहजपणे करु शकतो. पुनर्वापर हा त्यातीलच एक भाग आहे. फुकट गेलेल्या वस्तुंपासून नवीन काही तरी बनवणं, स्वतःच्या सवयी बदलणं, नवीन गोष्टींचं आकर्षण वाटणं हे स्वाभाविक आहे; पण त्याचा हव्यास नसावा. पर्यावरणाला हातभार लावण्याची सुरुवात स्वतःपासून केली तरच आपण दुसऱ्याला हक्काने सांगू शकतो।
पर्यावरण... आजकाल परवलीचा झालेला शब्द ! प्रत्येकाच्या तोंडी त्याचा उच्चार, त्याची चर्चा आणि त्यावर स्वतःची मत मांडण्याची घाई ! अर्थात त्याचा अर्थ, त्याचं महत्त्व, त्याची गरज माहिती असो वा नसो, पर्यावरणावर मात्र तावातावाने बोलायचं ! खरंतर साध्या साध्या गोष्टीतून आपण निसर्गाच्या विरुद्ध कसे वागतो हेच कुणाच्या लक्षात येत नाही. वृक्षतोड करु नका ,थर्माकोल वापरू नका, प्लॅस्टिकचा वापर टाळा, पर्यावरणाचा तोल सांभाळा अशा घोषणा वाचल्या/ऐकल्यावर आपल्याला कळतं की, आपण या सर्व गोष्टींचा कधी विचारच केला नव्हता. आता त्याचे विपरीत परिणाम दिसायला लागल्यावर एकदम सर्वांनाच जाग आली.
झाडे लावा, झाडे जगवा म्हणताना हज्जारो झाडांची कत्तल चालू आहे. असलेली झाडे तोडायची नि गाजावाजा करत नवीन रोपे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे असा द्राविडी प्राणायाम चालू आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळा म्हणताना प्रत्येक गोष्टीसाठी प्लॅस्टिकची गरज आपण निर्माण केली. त्याची इतकी सवय झाली की, प्लॅस्टिक येण्यापूर्वी त्यावाचून काही नडत नव्हतं हेच आपण विसरुन गेलोय. आता त्यावर कायद्याने बंदी आणून ते बंद करण्यासाठी अनेक उपाय शोधले जाताहेत. कापडी पिशवी वापरायची लाज वाटते, कमीपणा वाटतो. फँशनच्या नावाखाली आणि बदललेल्या राहणीमानामुळे बेसुमार वाढलेल्या प्लॅस्टिकला आळा कसा घालायचा हीच मोठी समस्या आहे.
थर्मोकोल! याचा वापर इतका प्रचंड आहे की, पँकिंगसाठी तयार झालेला हा थर्मोकोल डेकोरेशनसाठी इतका वापरला गेला की, स्पर्धा निर्माण झाली. अगदी ताटवाटीपासून प्रत्येक वस्तूला पर्याय ठरला जातोय. लाखो रुपयांच्या डेकोरेशनसाठी वारेमाप वापर व्हायला लागला. आता बंदीनंतर त्याला पर्याय शोधला जातोय.
हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण आणि ध्वनीप्रदूषणाचा पर्यावरणावर होणारा वाईट परिणाम मनुष्याच्या जीविताला किती धोकादायक आहे हे संशोधनाने सिद्ध झालंय. हे सारं मर्यादेपलीकडे गेलं असून वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात अनेक संकटांना तोंड द्यावं लागणार आहे.
पर्यावरणाला हानिकारक वस्तूंना पर्याय शोधण्यापूर्वीच बंदी आणणं हे जेवढं आततायीपणाचं आहे तेवढंच लोकांची मानसिकता बदलणंही महत्वाचं आहे. प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेल्या मिटींगला येणाऱ्यांना पाणी पिण्यासाठी बिसलेरीच्या बाटल्या तयार असतात.प्लॅस्टिक बाटलीतून पाणी पिऊन प्लॅस्टिक बंदीचा निर्णय जाहीर होतो. यातील विनोदाचा भाग सोडला तरी हे विदारक सत्य आहे. अशाच विषयावरील माझी स्वतःची चारोळी येथे लिहायचा मोह आवरता येत नाही.
नळपाणी योजनेसाठी
गावकरी मंत्र्याला बोलावतात
बिसलेरी चं पाणी पिऊन
तेच मंत्री उद्घाटन करतात
मानवी प्रवृत्तीचा विचार केला तर, जेथे बंदी किंवा अटकाव केला जातो तीच गोष्ट जास्त प्रमाणात केली जाते. आजपर्यंत ज्या ज्या गोष्टींवर बंदी घातली गेली ती गोष्ट चोरुनलपून करण्याकडे कल असतो असा अनुभव आहे. स्वतःहून बदल करायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं. पण लक्षात कोण घेतो ?
पर्यावरण पूरक अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण सहजपणे करु शकतो. पुनर्वापर हा त्यातीलच एक भाग आहे. फुकट गेलेल्या वस्तुंपासून नवीन काही तरी बनवणं, स्वतःच्या सवयी बदलणं, नवीन गोष्टींचं आकर्षण वाटणं हे स्वाभाविक आहे; पण त्याचा हव्यास नसावा. पर्यावरणाला हातभार लावण्याची सुरुवात स्वतःपासून केली तरच आपण दुसऱ्याला हक्काने सांगू शकतो।
दरवर्षी ५जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. सरकारी पातळीवर, तसेच सामाजिक संस्थांंमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. त्यासाठी प्रचंड खर्च केला जातो. पण त्यातून निष्पन्न काय नि किती होतं हा संशोधनाचाच विषय आहे.
मी स्वतः पर्यावरणपूरक अनेक गोष्टी करताना या कामात आपलाही खारीचा वाटा आहे याचं समाधान मला निश्चित मिळतं. पेपर बँगवर सुलेखन करताना मला सुचलेले हे एक घोषवाक्य....
पर्यावरणाचा टळेल -हास
सोडता प्लॅस्टिकचा हव्यास
यावर आता एकच उपाय
कापडी नि पेपरबँग हाच पर्याय
- विलास समेळ